२४ एप्रिल, १८९२ रोजी स्थापन झालेली आपली संस्था १३१ वर्षात वाटचाल करत आहे.छबिलदास हायस्कूल व हायस्कूल, कल्याण या दोन शाळांच्या कारभाराने सुरू झालेल्या या मराठी माध्यमात संस्थेच्या अधिपत्याखाली ८ पूर्व-प्राथमिक, ८ प्राथमिक, ९ माध्यमिक शाळा , ८ कनिष्ट महाविद्यालये तसेच इंग्रजी माध्यमाच्या २ पूर्व-प्राथमिक, २ प्राथमिक व २ माध्यमिक शाळा व २ सी .बी .एस .ई .स्कूल, २ इंटरनॅशनल स्कूल आणि १ एस् .एन् .डी .टी .महिला महाविद्यालय आहे.
संस्थेच्या मराठी माध्यमाच्या माध्यमिक शाळांस शासनाकडून अनुदान मिळते.या अनुदानातुन शिक्षक/शिक्षकेतरांचा वेतन खर्च भागतो.मात्र गेली अनेक वर्षे शाळांच्या वेतनेतर खर्चासाठी तसेच शाळांच्या इमारत भाडेपोटी मिळणारे अनुदान जवळपास बंद झाले आहे.शासनाकडून रक्कम रू.८ कोटी पेक्षा अधिक अनुदान मिळणे अपेक्षित आहे.मात्र सध्याच्या शासकीय धोरणानुसार सदर रक्कम नजीकच्या काळात मिळण्याची शक्यता नाही.शाळांच्या इमारती जुन्या असल्याने इमारती दुरूस्ती, इमारत विकास, इमारत रंगकाम यावर सातत्याने आर्थिक तरतूद करणे आवष्यक आहे. यासाठी शासनाकडून अनुदान मिळत नाही.शासनाकडून इमारत भाडेपोटी प्रतिवर्शी रू.२८ लाख अनुदान अपेक्षित आहे.मात्र सदर अनुदान गेल्या २० वर्षात मिळालेले नाही.पर्यायाने ही कामे करणे संस्थेस अशक्यप्राय झाले आहे.तरीही संस्थेने ही कामे हातात घेऊन पूर्णत्वास नेलेली आहेत.तसेच ९ प्राथमिक शाळांपैकी फक्त ३ शाळांस पूर्ण वेतन अनुदान व २ शाळांस अंशतः वेतन अनुदान मिळते. अन्य ४ प्राथमिक शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा व तसेच सर्व पूर्व-प्राथमिक शाळांना अनुदान मिळत नसल्याने या शाळांतील शिक्षक/सेवकांचे वेतन तसेच शिक्षक/शिक्षकेतरांचा निवृत्तीमुळे रिक्त होणा-या जागा नव्याने भरण्यास शासनाची बंदी आहे.त्यामुळे अशा रिक्त जागा संस्थेतर्फे वेतन देऊन भराव्या लागतात.तसेच वेतनेतर खर्चाचा बोजा संस्थेवर पडतो. पूर्व-प्राथमिक/प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक/शिक्षकेतरांचा वेतनापोटी दरवर्शी सुमारे ५ कोटी २५ लाख रूपये खर्च संस्थेस करावा लागतो .
अंशतः विनाअनुदानित तसेच ४ विनाअनुदानित शाळांनी शासनाचे वेतन/वेतनेतर अनुदानाचे सर्व निकश पूर्ण केले आहेत.मात्र अद्याप शासनाकडून अनुदान मिळालेले नाही.
आर्थिक वर्ष २०२२-२३ पासून संस्थेने संस्था पातळीवर कार्यरत शिक्षकांना वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला.सर्व सी .बी .एस .ई.अभ्यासक्रमाच्या शाळा तसेच इंग्रजी माध्यम शाळांमध्यें विद्यार्थी संख्येबरोबरच कर्मचारी संख्या वाढत असल्याने २०२२-२३ मध्यें वेतनापोटी खर्च रू.7 कोटी 50 लाख अपेक्षित आहे.असे असले तरी संस्थेने शाळांच्या विकासाकडे दुर्लक्ष केलेले नाही.गेल्या ३० वर्षात संस्थेने मो.ह .विद्यालय ठाणे, हायस्कूल कुर्ला, न्यू हायस्कूल कल्याण, सुभेदारवाडा हायस्कूल कल्याण, स.वा .जोशी विद्यालय डोंबिवली, प .रा .विद्यालय, भिवंडी, नेटिव्ह इन्स्टिटयूशन उरण व ज .हे .भगत डुंगे-वडघर, मो.ह .विद्यालय ठाणे व छबिलदास हायस्कूल दादर या शाळांच्या इमारत बांधकाम/दुरूस्ती/विस्तार प्रकल्पाचे काम तसेच स .वा .जोशी शाळेत अद्ययावत प्रयोगशाळा, महिला महाविद्यालय, डोंबिवली साठी आवश्यक सोयी सुविधा इ.कामे हाती घेऊन पूर्णत्वास नेले आहे.
सध्या संस्थेसमोर न्यू हायस्कूल कल्याण, नेटिव्ह इन्स्टिटयूशन उरण इमारत दुरूस्ती व मैदान विकास व स.वा .जोशी विद्यालय संकूल मैदान विकास प्रकल्प, तसेच पूर्व-प्राथमिक/प्राथमिक शाळा (इंग्रजी माध्यम/सी .बी .एस .ई.डोंबिवली) इमारत विस्तार प्रकल्प, हायस्कूल कल्याण या शाळेच्या ४ थ्या मजल्याचे बांधकाम सर्व शाळांच्या इमारतींची दुरूस्ती, तसेच शक्य झाल्यास इमारतीचे रंगकाम इत्यादी प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.या सर्व कामांसाठी सुमारे ३५ ते ४० कोटी खर्च अपेक्षित आहे.आपणा सर्वांच्या सहकार्याने सदर रक्कम उभारणे शक्य आहे.संस्थेच्या संचालक मंडळाने सर्व बाबींचा विचार करून संस्था सभासदांकडून देणगी/मुदत ठेव रक्कम स्विकारावी असा निर्णय घेतला आहे . आपणांस आग्रहाची विनंती की, आपणांस शक्य असेल तेवढी रक्कम संस्थेस देणगी दाखल द्यावी तसेच किमान रक्कम रू.१०,०००/- (रू.दहा हजार फक्त) कमीत कमी १ वर्ष वा त्याहून अधिक कालावधीसाठी ठेव म्हणून शक्यतो बिनव्याजी द्यावी. या व्यतिरिक्त शाळांची वाचनालये, व्यायामशाळा, प्रयोगशाळा, चित्रकला कक्ष तसेच वर्गखोल्या, बांधकामापोटी भरघोस देणगी देणा-या दात्याचे नाव सदर कक्षास देता येईल.तसेच शाळांमधील हॉल व संस्थेच्या सर्व पूर्व-प्राथमिक/प्राथमिक शाळा, कनिष्ट महाविद्यालये यांना भरघोस देणगी मिळाल्यास शाळेस देणगीदाराचे नाव देणे शक्य आहे याची नोंद घ्यावी . आपणांस कळकळीची विनंती की, आपल्या परिचयातील दानशूर व्यक्ती/संस्था यांच्याशी संपर्क साधून संस्थेस भरघोस देणगी मिळवून द्यावी, तसेच आपणही व्यक्तिषः संस्थेस देणगी/मुदत ठेव स्वरूपात शक्य असेल तेवढी रक्कम द्यावी.देणगी रक्कम आयकर कलम ८० अंतर्गत कर सवलतीस पात्र आहे.अधिक माहितीसाठी आपल्या गावात असलेल्या संस्थेच्या शाळांचे मुख्याध्यापक/शालेय समिती अध्यक्ष अथवा संस्थेच्या दादर येथील कार्यालयात संस्था कार्यवाह/कोषाध्यक्ष यांचेशी संपर्क साधावा . आपल्या व्यवसायाशी निगडित अशा दानशूर व्यक्तिंशी /संस्थांशी आपण संस्थेच्या पदाधिका-यांशी भेट घडवून आणली तर निधी संकलन करणे सुकर होईल असा विश्वास आहे . संस्थेचे आद्य संस्थापक कै.गो.ना.अक्षीकर व त्यांच्या सहका-यांनी अथक परिश्रमाने तन-मन-धन अर्पण करून संस्थेची उभारणी केली.या संस्थेच्या विकासासाठी विद्यमान संचालक मंडळाने हाती घेतलेल्या कामाचे शिवधनुष्य आपणा सर्वांच्या सहकार्याने पेलणे सहज शक्य आहे याची संस्थेस खात्री वाटते. संस्थेवर आपला लोभ आहे, तो अधिक वृध्दिंगत व्हावा .
श्री.रवींद्र कृष्णाजी तामरस
श्री.शैलेंद्र राजाराम साळवी
श्री.प्रदिप विश्राम गोसावी
श्री.प्रकाश निळकंठ अधटराव
कोषाध्यक्ष
कार्याध्यक्ष
उपकार्याध्यक्ष
कार्यवाह